मंगळवार, २८ मे, २०१३

राज नावाचं वादळ, बाकी सगळे भोंगळ (लेख-१)


येत्या 2014 साली होणा-या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमुळे सगळे पक्ष कामाला लागले आहेत. संभाव्य नेते, पक्ष यांच्या जुड्या करण्याचे काम करण्यासाठी काही राजकीय दलाल मंडळी कामाला लागली आहेत. कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपा-शिवसेना आणि रिपाईची महायुती आताच झाली आहे. मात्र या महायुतीतील भाजपाला प्रथमपासून राज नावचे झंझावात सोबत असावा असे वाटते. शिवसेना मात्र असे स्पष्ट बोलू शकत नाही. पण टाळ्यांची भाषा मात्र चालू होती. महायुतीचा एक घटक असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्या अध्यक्षांनी सहभागी व्हावे यासाठी ते आग्रही आहेत. तर याउलट रामदास आठवलेंनी त्याला उघड-उघड विरोध केला. मात्र परवा त्यांनी कुर्ला येथे रिपाईच्या मेळाव्यात राज ठाकरे यांना महायुतीत सहभागी व्हावे असे त्यांच्या भाषेत आव्हान( नव्हे आवाहन ) केले. आठवले यांच्या या नव्या पावित्र्यांने अनेकांच्या भुवया उंचावल्या नाही तर नवल!
जे आठवले काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंना महायुतीत घेतले तर या महायुतीतून बाहेर पडण्याच्या वल्गना करीत होते. त्यांचे एवढ्या जलद गतीने महापरिवर्तन व्हावे सारे अजब-गजबच म्हणावा असा हा मामला आहे. राजकीय पोळी आणि सत्तेची आस लागल्यावर माणसात काय काय परिवर्तन होऊ शकते याचा रामदास आठवले चालता बोलता नमुना आहे. याच रामदास आठवलेंनी कॉंग्रेससोबत घरोबा करताना ते भाजपा- शिवसेनेची जातीयवादी-धर्मांध म्हणून विखारी शब्दात संभावना करीत. त्याच पक्षांच्या कडेवर बसण्याची वेळ आठवले यांच्यावर आली आहे.
दुसरे म्हणजे राज ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यावर त्यावेळी या सा-यांनी येथेच्छ तोंड सुख घेतले होते. त्यात शरद पवार हेही आघाडीवर होते. पक्ष चालविण्यासाठी लवकर उठावे लागते अशी खोचक आणि बोचरी टीका त्यावेळी पवार यांनी केली होती. सर्वांच्या टीका टिपण्ण्यांना गेल्या ७ वर्षात राज यांनी आपल्या वर्क्तृत्व, कल्पकता, ध्यास आणि ध्येयातून चोख उत्तर दिले आहे. मनसेचा सात वर्षातील चढता आलेख अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. शिवाय पक्षाला सावधपणे योग्य दिशेने नेण्याचे काम ते करीत आहेत. मी महाऱाष्ट्राचा, महाराष्ट्र माझा हे त्यांचे ब्रीद आहे. त्याला प्रमाण मानून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र त्यांना घडविण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला आहे. मोजक्या निष्ठावानांच्या साथीने त्यांची आणि पक्षाची वाटचाल सुरू आहे.
शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात त्या पक्षावर जशी दडपशाही आणि जुलूम झाला तसा जुलूम दडपशाही मनसेच्या कार्यकर्त्यांवरच नाही तर खुद्द राज यांच्यावर आघाडी सरकार करीत आहे. या सा-याला धारिष्ट्याने तोंड देत मनसेची वाटचाल करीत आहेत. त्यामुळे राज यांची भूमिका प्रथपासून एकला चलो रे अशी आहे. महायुतीला वाटते की त्यांनी टाळी द्यावी. पण अशा टाळ्या चापट्या मारण्यात त्यांना अजिबात रस नाही. ते देतील तो धडका आणि दणका! सगळे एकत्र आले तर आघाडीची सत्ता उखडली जाईल. पण मनसेला त्याची गरज नाही. राज नावाचे वादळ आहे, २०१४ निवडणुकीत ते चक्रीवादळ बनून अनेकांना दूर फेकून देईल. त्यामुळे भोंगळ चर्चा रंगविण्यात काही अर्थ नाही. पायाखालील वाळू सरकत असताना, टणक खडकावर उभे असल्याचा हा आव कशाला?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: