शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

नैतिकता बेंगरूऴ चालीवर.....

अल्पमतातील भाजपाचे सरकार राष्ट्रवादीच्या बेंगरूळ चालीने सत्तेवर आले. भाजपाच्या या सरकारचे नैतिक अधःपतन झाल्याचे  छत्रपतींचा महाराष्ट्र पाहत आहे. सर्वच स्तरातून भाजपाची होणारी छी-थू पाहिली की खरंच हा सहा महिन्यापूर्वी बोलबचनगिरी करणारा पक्ष पुरता कावेबाज निघला. जेव्हा युती तुटली तेव्हा मी फेसबुकच्या माध्यमातून भाजपा हा राज्याला सर्वाधिक घातक असल्याचे म्हटले होते. नेमके हे विधान तंतोतंत खरे ठरले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल व्यक्तिशः मला खूप आदर आहे. भारतीय विचारदर्शन या संघाच्या संस्थेतर्फे चालविल्या जाणा-या मुंबई तरूण भारत या दैनिकात मी उपनगराचा वार्ताहर म्हणून माझ्या पत्रकारितेला सुरवात केली. तब्बल 14 वर्षे या संस्थेत काम करताना मला संघाचा कधीही जातीयवाद जाणवला नाही. एक वैचारिक जडण-घडण येथे झाली. संपादक सुधीर जोगळेकर, पदमाकर  कार्येकर, लक्ष्मीकांत जोशी, कै. नरेंद्र पाठक या सारख्या वरिष्ठांनी विविध ठिकाणी वृत्तांकनाची संधी दिली. तशीच शिवसेना ही मी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. पण संघ परिवाराचे सेवा कार्य फार जवळून पाहता आले. विविध प्रकारच्या संस्था आणि व्यक्तिंचा स्नेहभाव अनुभवायला मिळाला. यातून सांगायचे तात्पर्य एकच की मा. पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणतात की, हे दिवस पाहण्यासाठी पिढ्या खपल्या आहेत. हे त्रिकालबाधित असे सत्य आहे. पण महाराष्ट्रात भाजपाच्या दळभद्री राजकारणाने या सेवाभावाची पुरती वाट लावली आहे.

संघाच्या विचारधारेतून निर्माण झालेला जनसंघ आणि भाजपा याने हा सेवाभाव उचलला नाही.  म्हणूनच त्यांनी राज्यात न मागता पाठींबा देणा-या राष्ट्रवादीच्या जीवावर सेवेचा जुगार खेळत आहे. आणि आपण सोवळे नाहीत. सगळे खुंटीला टांगल्याचे आवाजीपणे सांगून टाकले आहे. नैतिकतेवर आधारित सरकार भाजपा आणील असे वाटले होते. मात्र ते सारे फोल ठरले. 

सध्या भाजपा 25 वर्षे ज्या सेनेबरोबर संसार केला त्या शिवसेनेला दोष देत आहे. सेनेलाच जागा वाटपापासून युती नको होती असे सांगत आहे. धांदात खोटी आवई उठवत आहे. खरे तर मुंबईत भाजपाचे जेव्हा शिबिर झाले तेव्हा मधु चव्हाणसारख्या अनेक नेत्यांनी सेना भाजपा युती नको अशी जाहीर भूमिका मांडली होती सेनेबरोबर फरफट होते अशी तक्रार पहिल्यापासून भाजपाची होती. केवळ  महाजन-मुंडे यांच्या दूरदर्शी विचार आणि द्रष्टेपणामुळे ही युती टिकली होती. त्यामुळे शिवसेनेवर युती तोडण्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. जे तुमच्या मनात होते तेच तुम्ही संधी मिळताच संधीसाधुपणे केलेत. निवडणुकीपूर्वीच थेट युती तोडून आम्हांला एकमेकांची ताकत अजमावायची आहे आहे असे सांगून जरी पुन्हा एकत्र आला असतात तर त्याचे जनतेला काही वाटले नसते.  सेनेला नमवण्याच्या नादात भाजपाने आणि भाजपाला नमविण्याच्या नादात सेनेने आपलीच अब्रू घालवून घेतली आहे, भाजपाची दुटप्पी नीति आजच्या महाराष्ट्राला पटलेली नाही. ज्यांनी मतं दिली त्यांना आता पश्चाताप होत आहे. येणा-या काळात हे सावरण्याची कसरत देवेंद्र करतील का आणि त्यांना ते जमेल का असा मोठा प्रश्न आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: