शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

नैतिकता बेंगरूऴ चालीवर.....

अल्पमतातील भाजपाचे सरकार राष्ट्रवादीच्या बेंगरूळ चालीने सत्तेवर आले. भाजपाच्या या सरकारचे नैतिक अधःपतन झाल्याचे  छत्रपतींचा महाराष्ट्र पाहत आहे. सर्वच स्तरातून भाजपाची होणारी छी-थू पाहिली की खरंच हा सहा महिन्यापूर्वी बोलबचनगिरी करणारा पक्ष पुरता कावेबाज निघला. जेव्हा युती तुटली तेव्हा मी फेसबुकच्या माध्यमातून भाजपा हा राज्याला सर्वाधिक घातक असल्याचे म्हटले होते. नेमके हे विधान तंतोतंत खरे ठरले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल व्यक्तिशः मला खूप आदर आहे. भारतीय विचारदर्शन या संघाच्या संस्थेतर्फे चालविल्या जाणा-या मुंबई तरूण भारत या दैनिकात मी उपनगराचा वार्ताहर म्हणून माझ्या पत्रकारितेला सुरवात केली. तब्बल 14 वर्षे या संस्थेत काम करताना मला संघाचा कधीही जातीयवाद जाणवला नाही. एक वैचारिक जडण-घडण येथे झाली. संपादक सुधीर जोगळेकर, पदमाकर  कार्येकर, लक्ष्मीकांत जोशी, कै. नरेंद्र पाठक या सारख्या वरिष्ठांनी विविध ठिकाणी वृत्तांकनाची संधी दिली. तशीच शिवसेना ही मी जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. पण संघ परिवाराचे सेवा कार्य फार जवळून पाहता आले. विविध प्रकारच्या संस्था आणि व्यक्तिंचा स्नेहभाव अनुभवायला मिळाला. यातून सांगायचे तात्पर्य एकच की मा. पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणतात की, हे दिवस पाहण्यासाठी पिढ्या खपल्या आहेत. हे त्रिकालबाधित असे सत्य आहे. पण महाराष्ट्रात भाजपाच्या दळभद्री राजकारणाने या सेवाभावाची पुरती वाट लावली आहे.

संघाच्या विचारधारेतून निर्माण झालेला जनसंघ आणि भाजपा याने हा सेवाभाव उचलला नाही.  म्हणूनच त्यांनी राज्यात न मागता पाठींबा देणा-या राष्ट्रवादीच्या जीवावर सेवेचा जुगार खेळत आहे. आणि आपण सोवळे नाहीत. सगळे खुंटीला टांगल्याचे आवाजीपणे सांगून टाकले आहे. नैतिकतेवर आधारित सरकार भाजपा आणील असे वाटले होते. मात्र ते सारे फोल ठरले. 

सध्या भाजपा 25 वर्षे ज्या सेनेबरोबर संसार केला त्या शिवसेनेला दोष देत आहे. सेनेलाच जागा वाटपापासून युती नको होती असे सांगत आहे. धांदात खोटी आवई उठवत आहे. खरे तर मुंबईत भाजपाचे जेव्हा शिबिर झाले तेव्हा मधु चव्हाणसारख्या अनेक नेत्यांनी सेना भाजपा युती नको अशी जाहीर भूमिका मांडली होती सेनेबरोबर फरफट होते अशी तक्रार पहिल्यापासून भाजपाची होती. केवळ  महाजन-मुंडे यांच्या दूरदर्शी विचार आणि द्रष्टेपणामुळे ही युती टिकली होती. त्यामुळे शिवसेनेवर युती तोडण्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. जे तुमच्या मनात होते तेच तुम्ही संधी मिळताच संधीसाधुपणे केलेत. निवडणुकीपूर्वीच थेट युती तोडून आम्हांला एकमेकांची ताकत अजमावायची आहे आहे असे सांगून जरी पुन्हा एकत्र आला असतात तर त्याचे जनतेला काही वाटले नसते.  सेनेला नमवण्याच्या नादात भाजपाने आणि भाजपाला नमविण्याच्या नादात सेनेने आपलीच अब्रू घालवून घेतली आहे, भाजपाची दुटप्पी नीति आजच्या महाराष्ट्राला पटलेली नाही. ज्यांनी मतं दिली त्यांना आता पश्चाताप होत आहे. येणा-या काळात हे सावरण्याची कसरत देवेंद्र करतील का आणि त्यांना ते जमेल का असा मोठा प्रश्न आहे.


गुरुवार, ५ जून, २०१४

पश्चिम घाट संवर्धन वारसाःपरि-संवेदनशील गावांचा प्रश्न-भाग(1)

जैवविविधतेने नटलेल्या देशातील पश्चिम घाट परि संवेदनशील क्षेत्रात राज्यातील 12 जिल्ह्यातील 56 तालुक्यातील 2200 गावे परि-संवेदनशील( इको सेन्ससिटीव्ह झोन) गावांची क्षेत्र सीमा ठरविण्यासाठी गावनिहाय आणि राज्य स्तरीय समित्या स्थापण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  या निर्णयाने आता केवळ कोकणवासियांच्या जीवनाशी निगडीत पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न ऐरणीवर येणार असले तरी यातून पर्यावरण समृद्द गाव आणि पर्यटनला चालना मिळेल. मात्र या संवेदनशील क्षेत्रामुळे अनेक गैरसमज यापूर्वीच पसरवले गेले आहेत. आता समित्या स्थापनेमुळे ग्रामीणांना या समित्यांमार्फत जनसुनावणीत भाग घेता येणार आहे.
पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र( इको सेन्ससिटीव्ह झोन) अधिसूचित करण्यापूर्वी राज्य शासनाकडून प्रत्यक्ष क्षेत्र तपासणी करून त्या आधारे निश्चित होणा-या सीमेनुसार काही बदल आवश्यक असल्यास डॉ. के कस्तूरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्च स्तरीय कार्यगटाच्या अहवालात योग्य ते बदल करून त्या समितीचा अहवाल मान्य करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे. डॉ. के कस्तूरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालात राज्यातील सुमारे 17340 चौ. किमी क्षेत्र परि-संवेदनशील क्षेत्रात मोडत असल्याचे नमूद केले आहे. 
त्यामुळे केंद्र शासनाच्या प्रस्तावानुसार या क्षेत्राची प्रत्यक्ष तपासणी करून केंद्र शासनास अहवाल सादर करण्यासाठी गाव पातळीवर संबंधित गावाच्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवर समिती गठीत करण्याचे आदेश शासनाच्या महसूल व वन विभागाने काढले आहेत. त्यानुसार या समितीत संबंधित गावचे सरपंच हे अध्यक्ष असतील तर समिती सदस्य आणि सचिव म्हणून ग्रामसेवक असणार आहे. या समितीत सदस्य म्हणून स्थानिक वनरक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचा समावेश करण्यात आले आहे.

या समितीने परि-संवेदनशील क्षेत्राच्या संबंधात जनसुनावणी घेवून परि-संवेदनशील क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे चिन्हांकन करणे आणि नकाशा तयार करायचा आहे. प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे तयार केलेल्या अहवालाचा अभ्यास करून प्रत्येक गावातील नैसर्गिक जैवविविधतेने समृद्ध भूक्षेत्र, मानवनिर्मित भूवापर, वनक्षेत्र, तलाव, नदी-नाले, गुरचराई क्षेत्र विचारात घेवून परि-संवेदनशील क्षेत्राचे आरेखन कराण्याच्या सूचना देण्यात ल्या असून आरेखन करताना कुठल्या क्षेत्राचा परि-संवेदनशील क्षेत्रात समावेश करावा याबाबत या समितीने अभिप्रायही द्यायचे आहेत. परि-संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासंदर्भात केलेल्या शिफारशीबाबत संक्षिप्त कारणे गाव पातळीवरील समितीला नमूद करावी लागणार आहेत. या समितीस राज्य पातळीवरील समिती मार्गदर्शन करणार आहे. समितीला काम करता यावे यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक सेवा निवृत्त वनसंरक्षक, कृषी अधिकारी व महसूल सर्वेक्षक यांची सहा महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचेही आदेश आहेत. गाव निहाय समितीने आपला अहवाल 4 महिन्याच्या आत राज्य स्तरीय समितीला सादर करायचा आहे. गाव निहाय समितीने तयार केलेल्या अहवालांच्या संदर्भात एखाद्या मुद्दावर अतिरिक्त माहिती मागविण्याचा, सुधारित माहिती मागविण्याचा अधिकार राजस्तरीय समितीला देण्यात आला आहे. राजस्तरीय समितीने आपला अहवाल दोन महिन्यात राज्य शासनाला सादर करायचा आहे. पाच सदस्यीय राज्य स्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून शासनाने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. एरिच भरूचा यांची नियुक्ती केली आहे. याखेरीज या समितीत प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक(प्रा)- (कोल्हापूर, पुणे नाशिक, ठाणे), विभागीय सहसंचालक, कृषी ( कोकण,पुणे, नाशिक) आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव, तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. 

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

राहुलबाबा खरे बोलला ओ....

2014 मधे देशाचा भावी पंतप्रधान कोण? हा  प्रश्न भारतीय जनता पक्षाने अगोदरच सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. नमो नम आणि गुजरातचे विकासपुरूष नव्हे विनाशपुरूष नरेंद्र मोदी आहेत ( असे भाजपाच्या परतून आलेल्या नेत्या  उमा भारती म्हणालेल्या आहेत) . अर्थात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे त्या कृष्ण लीला करीत आड- वाणी करीत आड आले. त्याला तोड नाही. सगळे भोग- पदे भोगलेले अडवाणी मोदींच्या आड येवून त्यांनी त्यांना शकून करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाच्या राजाने त्यांची समजूत काढली. तरी ही अनी-बनी संपलेली नाही. ती कधीही आणी-बाणी रूप घेवू शकते. हे एकूण लालजींच्या वर्तनावरून वाटते.  हे एकीकडचे चित्र आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये गांधी घरण्याचा वारसच वारसा हक्काने पुन्हा राहुलबाबांच्या रूपाने देशाचा पंतप्रधान म्हणून जाहीर होण्याची शक्यता आता मूळ धरू लागली आहे. कॉंग्रेसमधील लाचार नेते आपली जहागीरी शाबूत ठेवण्यासाठी लवकर त्यावर शिक्कामोर्तब करतील. राहुलबाबांच्या पावलांवर पावले ठेवत प्रियंकाबेबी पण कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या जबाबदारीवर येण्याची शक्यता आहे.
राहूलबाबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग परदेशात असताना देवरांच्या मिलिंदाकरवी लोकप्रतिनिधींना वाचविणा-या अध्यादेशाबाबत विरोधी टिवटीव केली होती. त्यावेळी अनेकांनी भुवय्या उंचावल्या. देवरांची काही खैर नाही असे काहींना वाटले. मात्र या टीवटीवित राहुलांचे पुढचे काव-काव सुरू झाले. त्यावरून राहुल ब्रिगेड आता किती सक्रीय झाली आहे. याचा अंदाज यावा.
राहुल गांधींनी लोकप्रतिनिधीना वाचविण्यासाठी आणल्या गेलेल्या वटहुकुमाला नॉनसेन्स करून सरकारला तो मागे घ्यायला लावून कॉग्रेसमधील भुतावळ आणि घटक पक्षांची पॉवर गुल केली आहे. राहुलबाबांचा हा एक निर्णय देश पातळीवर कलाटणी देणारा ठरणार आहे. राहुलबाबांच्या कृतीने आता कॉंग्रेस अंतर्गतही लगाम घालण्याचे धाडस त्यांनी करून एका दगडात किती तरी जणांना त्यांनी गारद केले आहे. त्यामुळे कोणी किती काही म्हणो-राहुलबाबा खरे बोलला ओ....

सोमवार, ८ जुलै, २०१३

युक्ता होती सर्वांच्या मुखी

1999 चा तो नेमका दिवस मला आठवत नाही. त्या दिवशी मुलुंड पश्चिम येथील रस्ते दुतर्फा माणसांनी भरून गेले होते. ती येणार ..ती येणार याची सारे मुलुंडकर वाट पाहत होते. आम्ही सगळे पत्रकार तेव्हा मेहुल टॉकीज समोरील त्या परीच्या बंगल्याजवळ वाट पाहत होतो. टाईम्स ग्रुप सोडला तर कोणत्याच पत्रकारांना त्या बंगल्यात प्रवेश नव्हता. बाहेर एक बग्गी उभी होती. वाहिन्याचे कॅमेरामन. आणि अमाप बघे ........ अखेर आकाशी रंगाचा सरारा सावरत ती आली. फोटो कॅमे-यांचा लखलखाट झाला.  आमची सा-याची धावपळ...पोलीसांचीही पळापळ.... विश्वसुंदरी झाल्यानंतर मुलुंडच्या कन्येची निघालेली ती मिरवणूक होती. शांती कॅम्पस् येथील तिच्या काकांच्या बंगल्यापासून ही मिरवणूक सुरू झाली. नेहरू मार्गाने पी. के. रोडवरून देवी दयाळ रोडवर अग्नीशमन केंद्र येथे ती  समाप्त झाली. 

आज सा-याची आठवण झाली ती तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाने.....  आता युक्ता मुखी ही चर्चेत आली आहे ती  आपला पती प्रिन्स तुली यांच्या विरोधात आंबोली पोलिस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. आंबोली पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम ४९८ अ (क्रुरता आणि प्रतारणा) आणि ३७७ (अनैसर्गिक सेक्स) अंतर्गत तक्रार दाखल आहे. मूळचे भारतीय असलेल्या तुली याचा न्यूयॉर्कमध्ये व्यापार आहे. तो फायनानशिएल कन्सल्टंट म्हणून काम करतो.  यापूर्वी युक्ता मुखीने पतीविरोधात अनेकवेळा तक्रारी दाखल केल्या आहेत.  युक्ताचे लग्न २ नोव्हेंबर २००८ रोजी झाले होते, तिला एक मुलगाही आहे. युक्ता मुखी डिसेंबर १९९९ मध्ये मिस वर्ल्ड बनली होती. तिला लंडनच्या ओलम्पिया थिएटरमध्ये मिस वर्ल्डचा मुकूट परिधान करण्यात आला होता. त्यावेळी मुखी २० वर्षांची होती. तीने अनेक बॉलिवुड चित्रपटातही काम केले आहे. चित्रपट करिअरमध्ये फारसे काही झाले नाही म्हणून तिने लग्न केले.


युक्ता मुखी ही मुलुंड कन्या. जे. जे. स्कूल अॅकेडमीची विद्यार्थीनी. वझे महाविद्यालयात तीने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. फारशी कुणाला कल्पना नसलेली ही विद्यार्थीनी. पण  मिस वर्ल्डचा मुकुट तिच्या शिरी झळकला आणि आम्हां मुलुंडकरच नाहीत तर भारत वर्षाला आनंद झाला.  मुलुंडमध्ये त्या दिवशी तिची निघालेली मिरवणूक शाही होती. मुलुंडकर अतिशय आनंदात होता. 

माणसं मोठी झाली ती आपले राहते घर पुढच्या प्रगतीसाठी हमाखास सोडतात. युक्तालाही त्याला अपवाद कशी असणार. तिच्या प्रसिद्धीचा आणि सौंदर्यांचा फायदा मिळवण्यासाठी आपल्याकडे बॉलीवूड नेहमीच पुढे असते. युक्ताला  सिनेमाच्या ऑफर आल्या. तिने मुलुंड सोडले. पण सौदर्याबरोबर अभिनय असावा लागतो. तो ऐश्वर्या,  प्रियांका चोप्रा सारखे अभिनयाचे अंग नसल्याने ती त्या विश्वात  चमकली नाही सपशेल आपटली. आणि बॉलीवुड अभिनेत्रींचा इतिहास आहे . त्या भले सर्व काही पडद्यावर पडद्यामागे रंगवतील. पण लग्न मात्र एखाद्या उद्योगपती वा कारखानदाराबरोबर करणार. हा भारतीय अभिनेत्रींचा इतिहास आहे. याला अपवाद फक्त ऐश्वर्या सारख्या बोटावर मोजण्या इतक्या अभिनेत्री आहेत.

विशेष म्हणजे तिच्या छळाच्या बाबतीत नेहमी पुढे असणा-या महिला संघटना गप्प आहेत. इतक्या तक्रारी तिने केल्या पण त्या अदखलपात्री कशा दाखल झाल्या. यातील काळेबेरे सांगायला कोणी ज्योतिषी नको..... यु्क्ताची ही बातमी वाचल्यावर मला तो मुलुंडमधील तिचा तो पाहिलेला दिवस आठवला. तिला पाहण्यासाठी प्रत्येक जण धडपड होता. त्यात माझ्यासारखा एक मुलुंडकर आणि पत्रकारही होता. तिच्या घरापासून निघालेल्या मिरवणुकीला लोकांची अलोट गर्दी होती. असंख्य माणसं होती. असंख्य माणसं रस्त्यावर उतरली होती. पतीच्या छळाच्या विरोध आज ती रस्त्यावर उतरली आहे. पण तिच्या सोबत तिचे कुटुंब वगळता कोणीच नाही...दैवाचे ...काळाचे चक्र किती उलटे आहे ना!  

मंगळवार, २८ मे, २०१३

राज नावाचं वादळ, बाकी सगळे भोंगळ (लेख-१)


येत्या 2014 साली होणा-या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमुळे सगळे पक्ष कामाला लागले आहेत. संभाव्य नेते, पक्ष यांच्या जुड्या करण्याचे काम करण्यासाठी काही राजकीय दलाल मंडळी कामाला लागली आहेत. कॉंग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपा-शिवसेना आणि रिपाईची महायुती आताच झाली आहे. मात्र या महायुतीतील भाजपाला प्रथमपासून राज नावचे झंझावात सोबत असावा असे वाटते. शिवसेना मात्र असे स्पष्ट बोलू शकत नाही. पण टाळ्यांची भाषा मात्र चालू होती. महायुतीचा एक घटक असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्या अध्यक्षांनी सहभागी व्हावे यासाठी ते आग्रही आहेत. तर याउलट रामदास आठवलेंनी त्याला उघड-उघड विरोध केला. मात्र परवा त्यांनी कुर्ला येथे रिपाईच्या मेळाव्यात राज ठाकरे यांना महायुतीत सहभागी व्हावे असे त्यांच्या भाषेत आव्हान( नव्हे आवाहन ) केले. आठवले यांच्या या नव्या पावित्र्यांने अनेकांच्या भुवया उंचावल्या नाही तर नवल!
जे आठवले काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंना महायुतीत घेतले तर या महायुतीतून बाहेर पडण्याच्या वल्गना करीत होते. त्यांचे एवढ्या जलद गतीने महापरिवर्तन व्हावे सारे अजब-गजबच म्हणावा असा हा मामला आहे. राजकीय पोळी आणि सत्तेची आस लागल्यावर माणसात काय काय परिवर्तन होऊ शकते याचा रामदास आठवले चालता बोलता नमुना आहे. याच रामदास आठवलेंनी कॉंग्रेससोबत घरोबा करताना ते भाजपा- शिवसेनेची जातीयवादी-धर्मांध म्हणून विखारी शब्दात संभावना करीत. त्याच पक्षांच्या कडेवर बसण्याची वेळ आठवले यांच्यावर आली आहे.
दुसरे म्हणजे राज ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केल्यावर त्यावेळी या सा-यांनी येथेच्छ तोंड सुख घेतले होते. त्यात शरद पवार हेही आघाडीवर होते. पक्ष चालविण्यासाठी लवकर उठावे लागते अशी खोचक आणि बोचरी टीका त्यावेळी पवार यांनी केली होती. सर्वांच्या टीका टिपण्ण्यांना गेल्या ७ वर्षात राज यांनी आपल्या वर्क्तृत्व, कल्पकता, ध्यास आणि ध्येयातून चोख उत्तर दिले आहे. मनसेचा सात वर्षातील चढता आलेख अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. शिवाय पक्षाला सावधपणे योग्य दिशेने नेण्याचे काम ते करीत आहेत. मी महाऱाष्ट्राचा, महाराष्ट्र माझा हे त्यांचे ब्रीद आहे. त्याला प्रमाण मानून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र त्यांना घडविण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला आहे. मोजक्या निष्ठावानांच्या साथीने त्यांची आणि पक्षाची वाटचाल सुरू आहे.
शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात त्या पक्षावर जशी दडपशाही आणि जुलूम झाला तसा जुलूम दडपशाही मनसेच्या कार्यकर्त्यांवरच नाही तर खुद्द राज यांच्यावर आघाडी सरकार करीत आहे. या सा-याला धारिष्ट्याने तोंड देत मनसेची वाटचाल करीत आहेत. त्यामुळे राज यांची भूमिका प्रथपासून एकला चलो रे अशी आहे. महायुतीला वाटते की त्यांनी टाळी द्यावी. पण अशा टाळ्या चापट्या मारण्यात त्यांना अजिबात रस नाही. ते देतील तो धडका आणि दणका! सगळे एकत्र आले तर आघाडीची सत्ता उखडली जाईल. पण मनसेला त्याची गरज नाही. राज नावाचे वादळ आहे, २०१४ निवडणुकीत ते चक्रीवादळ बनून अनेकांना दूर फेकून देईल. त्यामुळे भोंगळ चर्चा रंगविण्यात काही अर्थ नाही. पायाखालील वाळू सरकत असताना, टणक खडकावर उभे असल्याचा हा आव कशाला?

शुक्रवार, २४ मे, २०१३

हाय बापू तुमचा देश

हाय बापू तुमचा देश

बरोबर २००९ मध्ये  महात्मा गांधीच्या काही महत्त्वाच्या वापरलेल्या वस्तुंचा लिलाव झाला होता. त्यावेळी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी काही वस्तू खरेदी केल्या. आणि देशाची इभ्रत वाचविली. महात्मा गांधी हे देशाचे महान पुढारी. अहिंसेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ती झगडले हा सारा इतिहास पुन्हा सांगण्याची गरज नाही. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या अग्रणीने आपल्या वर्तनाने काही आदर्शही निर्माण केले. अशा बापूंचे साबरमती, मुंबई, पुणे आणि अगदी, लंडन -आफ्रिकेमध्ये वास्तव्य होते.. तेथे -तेथे त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वस्तू वापरल्या. 
त्यांनी वापरलेल्या वस्तूंना मरणोत्तर भाव येणे हे स्वाभाविक आहे. त्यांचा जाहीर लिलाव होतो. तो लिलाव कोणी तरी अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीच्या जोरावर मिरवण्यासाठी महापुरूषांच्या, त्यांनी वापरलेल्या वस्तू लिलावात खरेदी करण्याचा प्रघात आहे.अलिकडे गांधीजींच्या वस्तुंमध्ये त्यांनी वापरलेली शाल, त्यांच्या हस्ताक्षरातील गुजराती भाषेतील इच्छापत्र अशा काही वस्तूंचा लिलाव करण्यात आला. त्यांना काही कोटींचा भाव मिळाला. 
गांधी हे महात्मे . भारतीची संपत्ती. त्यांच्या विचारांचे अनुकरण नसेल पण वेळोवेळी त्यांच्या नावाचा वापर सारेच गांधीवादी करतात. गांधींजींना राष्ट्रपिता म्हणायचे, त्यांच्या नावांनी सत्ता मिळवाची. पोळ्या भाजून घ्यायच्या. एवढेच काय भारतीय चलन त्यांच्या छबीशिवाय चालत नाही. ज्यांच्या छबींनी-नोटांनी आर्थिक विनियम होतो. त्या गांधीजींच्या त्यांनी वापरलेल्या वस्तुंचा देशाबाहेर लिलाव होता. त्या वस्तू आपल्या खाजगी संग्रह आणि मिरवण्यासाठी घेतात. पण पुरोगामीपणाचा गांधीचा देश म्हणून मिरवणा-या सत्ताधारी, राजकारणी आणि केंद्र सरकार  यांना या लिलाव प्रक्रियेत भाग घेवून आपल्या राष्ट्रपित्याच्या महत्त्वाच्या वस्तु देशात आणता येत नाहीत. हा केवढा दुर्दैवाचा भाग आहे. गांधीच्या नावे राजकारण आणि सत्ता मिळवता येते. पण त्यांच्या चीज वस्तू आणण्याची धमक कॉंग्रेस सरकारच्यात धमक नाही हेच या लिलावातून दिसून आले.