सोमवार, २८ मार्च, २०११

दिवस शिमग्याचे

श्री एकविरा देवी, कोतापूर
गेल्यावर्षी गावाला मी आणि सुनिता लग्नानंतर प्रथम आणि गाव सोडल्यापासून होळीला असा २८ वर्षांनी गेलो. पण ही भेट अगदी धावती होती. चैतू आणि नमूला बरोबर न घेता होती. कोकणातील शिमगा हा काही वेगळाच सण आहे. पानगळ सरून निसर्ग नवी पालवी लेवीत असतो. थंडी कमी होऊन कडाक्याच्या उन्हाळ्यास सुरवात झालेली असते. तर दुसरीकडे आंबा, काजू आणि फणस, चाराबोरे यांना मोहोर येत असतो. निसर्ग या मोहोराने मोहरून गेलेला असतो. पूर्वी संक्रांतीलाच सुगडात आमच्या घरील मोठी आई विविध झाडांचा मोहोर घालण्यासाठी आम्हां पोरांना धाडीत असे.
झाडावरचा मोहोर खुडताना त्यांचा येणार गंध हवाहवासा वाटायचा. आता खास गंधासाठी नाही रानावनात मुंबईहून जावून फिरता येत. बालपण हे बालपण असते. देवाने दिलेल्या देणगीचा आस्वाद लुटवा तेवढी कमी आहे. गावातले दिवस पुन्हा नाही अनुभवता येणार. चांगल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म मिळणे, चांगले मित्र मिळणे ही जशी भाग्याची गोष्ट आहे तसेच चांगला गावात जन्म जन्म मिळण्यासाठी भाग्यात असावे लागते. गाव कितीही भानगडीचे असले तरी प्रत्येकाला नाराजी व्यक्त करून देखील आपण पुन्हा-पुन्हा त्या गावावर प्रेम करतोच. हे ऋणानुबंध न उलगडता येणारे आहेत.
गेली कित्येक वर्ष होळीच्या सणाला गावी जायला मिळाले नाही. पण गावतल्या रूढी परंपरा थांबलेल्या नाहीत. माझ्या गावात सुमारे ११ व्या शतकातील श्री एकविरा देवीचे मंदिर आहे. गावाचे हे आद्य दैवत आहे. गावातील बहुसंख्येने असलेला कुणबी समाज या देवीच्या सा-या प्रथा आतापर्यंत संभाळत आला आहे. आमच्या सुतार समाजास केवळ दिवाळीच्या सणाच्या दिवशी देवीच्या देवळाच्या भिंतीवर चुन्यात सूत भिजवून त्याने चाैकोनी आडव्या-तिडव्या रेघा मारण्याचा मान आहे. बाकी सा-या उत्सवात त्यांनी सहभागी होऊन त्यांचा आनंद लुटायचा एवढेच त्यांच्या वाट्याला आहे. पण ते त्यात फार सुख मानतात, केवढा आळशीपणा असो.
कोतापूर गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात येते. गावाची महती कुणीशा एका विद्वानाने एका अजरामर अशा श्लोकात वर्णीत केली आहे. ती अशी....

श्री लक्ष्मीकेशव आद्य दैवत पुढे
नंदीश गारगेश्वर,
अंबा एकविरा, नवग्रह हतसे
ग्रामेश स्थानेशवर
रिद्धीसिद्धीपती महागणपती
शेष शारदेचा पती
कोतापूर गाव सुरेख वसती
ग्रामस्थ लोकाप्रती
 
मला या श्लोकातील शेवटच्या ओळींमध्ये बदल करण्याचे अनावर होते.

श्री लक्ष्मीकेशव आद्य दैवत पुढे
नंदीश गारगेश्वर,
अंबा एकविरा, नवग्रह हतसे
ग्रामेश स्थानेशवर
रिद्धीसिद्धीपती महागणपती
शेष शारदेचा पती
कोतापूर गाव सुरेख वसती
ग्रामस्थ पुरकाप्रती

कोतापूरचाच नाही तर सारा कोकणातील होळी-शिमग्याचा सण हा एका मोठ्या परंपरेशी जोडलेला आहे. त्यातील वाईट प्रथा परंपरा कोकणी माणसाने वजा करून हा सण साजरा करायला हवा. होळीच्या सणासाठी कोकणात आंबा, फोफळी, सूरमाड या सारखी मोठमोठी झाडे आणि शिवर, पांगेरा यांसारखी औषधी झाडांची कत्तल केली जाते. ही कत्तल केवळ एकाच गावात नाही तर कोकणातल्या शेकडो गावांत होते. म्हणजे आतापर्यंत किती झाडांची परंपरेने कत्तल केली असेल याच विचारच करता येणार नाही. हे कुठेतरी थांबायला हवे.

  शिमग्याची पंरपरा
कोतापूर हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात येते. राजापूरतालुक्याच्या ठिकाणापासून १७ किमी तर जिल्ह्याच्या ठिकाणापासून सुमारे ५० किमी अंतरावर हे गाव आहे. रत्नागिरीवरून गावाला जाताना खरी मजा आहे. निसर्गाच्या खुशीत वसलेले हे गाव ३० वर्षापूर्वी अगदी नैसर्गिक दृष्ट्या विलेभिनीय होते. आता मात्र या गावाच्या निसर्ग संपदेची अधी अधिक वाट कोळसेवाल्यानी आमि जळावू लाकडाच्या दलालांनी लावली आहे. ही परिस्थिती कोकणाती सर्वच गावांची आहे. या सा-या निसर्ग -हासाला सारेच जबाबदार आहेत. असे असले तरी कोकणातल्या या परंपरा चालू राहणार आहेत. येथील कुणबी समाज ख-या-खु-या अर्थाने या परंपरा जोपासित आहे. या परंपरा जोपासताना येथील महिला वर्गाची कुतरओढ होताना पाहायला मिळाली. पूर्वी कोकणातील खेळे जे देव खेळे म्हणून ओळखले जातात, ते शिमग्याच्या दिवसात देवीचे पारंपारिक वेश परिधान करून  निघताना पंधरा दिवसाची बेगमी घेवून जात आता मात्र दळणवळणाच्या क्रांतीने या खेळ्याचे सारे जगच बदलून गेले आहे. हातात मोबाईल आणि टिपरी मारणारा आणि आधुनिक चालींच्या गाण्यावर गोमूला नाचवणारा नाखवा तयार झाला आहे. आता हे खेळे जेथे जा गावात मुक्कामाला असतात तेथे त्यांना डब्बा पोचवण्याचे काम त्यांच्या बायका -पोरांना करावे लागत आहे. बरीचशी मुले ही शाळा काँलेजात शिकत असल्याने आणि त्याच काळात परीक्षांचा हंगाम असतो. परिणामी ही मुले या खेळ्यांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण कमी होत आहे. ही पारंपारिकता जोपासणा-यासाठी चिंतेची बाब असली तरी समाजाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने आनंदाची बाब मानायला हवी. शिमग्या खेळ्यात सहभागी न होणा-या कुटुंब प्रमुखांच्या बायकांवर अलिखितपणे डबे पोचविण्याची टाकण्यात आलेली जबाबदारी किंवा काही रक्कमेचा आर्थिक दंड मात्र या परंपरेत न बसणारा वाटतो. शिमग्याच्या खेळ्यांच्या तोंडून गाईली जाणारी गाणी, त्यांच्या चाली या अतिशय पारंपारिक आहेत. या गाण्यात आणि या परंपरामध्ये फार मोठा प्राचिन इतिहास लपलेला आहे. त्याचे संग्रहीकरण होणे गरजेचे आहे. काही वर्षांनी हे सारे पाहायला मिळेल की नाही याची शंका वाटते.

कोतापूरची होळी
कोतापूरच्या शिमग्याची पंरपरा
सुमारे ११ शतकापूर्वी कोतापूर गाव वसल्याचा शिलालेखात उल्लेख आहे. शिलाहारांच्या नाही तर वाकाटक घराण्यापर्यंत या गावाचा मागे जाऊन भिडतो. गावाचे नवसाला पावणारे आणि संपूर्ण गावाची रखवाली करणारी ग्रामदैवत श्री एकविरा देवी ही या गावाचे दैवत आहे. गाव महार वतनदाराने वसवलेला आहे. त्यामुळे या गावाचा मूळ पुरूष वा मूळ देवता श्री पुरूक देव आहे. त्याचा मान मोठा पण त्याचे मंदिर मात्र जमिनदोस्त झाले आहे.उपेक्षित आहे, ग्रामदैवत एकविरेच्या भोवती सा-या गावच्या परंपरा गुंफलेल्या आणि गुरफटलेल्या आहेत. शिमगा-होळीचा सण हा गावातील वैशिष्ट्यपूर्ण असा असतो.
फाल्गुन शुक्ल एकादशीच्या दिवशी देवीचे खेळे देवीच्या घुमेवाडी तेथील मांडावर बसतात. तेथे पहिल्यांदा खेळ्यांना पारंपारिक पद्दतीने सुरवात करतात. आणि दुस-या दिवशी संध्याकाळी देवीच्या देवळातून हे खेळे  दोन-चार टिप-यांचा खेळ खेळून बाहेरच्या गावाला खेळ करायला निघतात. होळीच्या आदल्या दिवशी हे खेळे गावात येतात. गावच्या खेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिमग्याच्या कडक ऊनात अनवाणी लोकांच्या दारी जाऊन नाच करतात. पायात चपला घालून एखादी व्यक्ती पुढे आली तर तिला उचलून बोंब मारण्याची प्रथा आहे. या प्रथेला  मी लहानपणासून घाबरत आलो आहे. खेळे म्हणजे देवीचे रूप घेऊन वावरणा-या व्यक्ती आहेत. त्यांनी बोंब मारल्यावर त्याचे देणं द्यावं लागतं वगैरे गोष्टी लहानपणी गावात शिकताना  घरच्यांनी मनावर बिंबवल्या आहेत. अर्थात खेळ्यांनी पायताणं न गावाची वा देवीची सेवा रूजू करायची आणि सामान्या जनांनी मात्र पायताण घालून त्यांच्यासमोरून फिरावं ही परंपरेत न बसणारी बाब असल्यानेच ही प्रथा उदयास आली आहे.
गावचे खेळे होळीच्या आदल्या दिवशी गावात येतात. आणि फाल्गुन कृण्ण प्रतिपदेला म्हणजे वसंतोत्सवारंभाला होळीच्या मांडावर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी ही मानाची असते. कोतापूर हे पंचक्रोशीत सुपारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे ब्राह्मण समाजाच्या सुपारींच्या मोठमोठ्या बागा आहेत. या बागातील वर्षावळीप्रमाणे सुपारीचे झाड होळीसाठी ठरविले जाते. होळीसणाच्या आदल्या दिवशी गावातील मानकरी या फोफळीला निवडतात. खूण म्हणून या झाडाला हळदकुंकू लावले जाते. दुस-या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात ही होळीरूपी सुपारीचे झाड मानकरी तोडतात. जमिनीवर स्पर्श करू न देता ही होळी जमिनी उतरतात. सुमारे दोन-तीन किलोमीटरच्या परिसरातून ही होळी वाजत-गाजत होळीच्या मांडावर आणली जाते. रस्त्याने आणताना गावातील सर्व वर्गातील तरूण-प्रौढ ही होळी खेळवत आणतात. ही मजा बघण्यासारखी असते. होळी मांडावर आल्यानंतर ती उभी केली जाते सुमारे १०० फूट उंचीच होळी उभी करण्या नजारा ही मनात साठवण्याजोगा आहे. होळी उभी करण्या अगोदर एकविरा देवीची पालखी मांडावर विराजमान झालेली असते.
पारंपारिक पद्धतीने होळीची पूजा होते.पूजेनंतर होळीच्या भोवती मानक-यांमार्फत आणलेले गवत होळीच्या भोवती मानकरी पेटवतात.  या गवताची होणारी राख गावकरी श्रद्धेने अंगारा म्हणून कपाळी लावतात. होळीच्या बुंध्यावर सात फूटाच्या दरम्यान एक नारळ बांधतात. हा नारळ खेचण्याचा प्रयत्न प्रथम मानकरी करतात. त्यानंतर गावातला एखादी उंच व्यक्ती हा नारळ खेचते आणि एका रिंगणात हा नारळ सोडविण्याची पारंपारिक स्पर्धा सुरू होते. हा नारळ दुस-याच्या हातून सोडविणे म्हणजे एक प्रकारची शक्ती परीक्षा असते. प्रत्येक जणाला बोंब मारून होलयो..होलयो.. करीत या आखाड्यात खेचले जाते. ही स्पर्धा संपली की दुस-या एका अनोख्या स्पर्धेस सुरवात होते. ही स्पर्धा असते ती म्हणजे काळे दगड (हार्ड राँक) उचलण्याची. गावातील प्रत्येक तरूण यानिमित्ताने आपली ताकत अजमावतो.
हा शक्ती प्रकार सुरू असतानाच होळीला बोलले नवस प्रथम मानवले जातात. या नवसाच्या प्रकारात नारळाची तोरणे आणि गुळाच्या ढेपींचे प्रमाण खूप असते. या नवसातील पदार्थांचा गुळ-खोब-याचा प्रसाद गावक-यांना वाटला जातो. हा प्रसाद खाण्यात आणि लज्जत काही त्यावेळी वेगळीच असते.होळीला नवीन नवरे होळीला भेटविण्याची प्रथा आहे.
अलिकडे या प्रथा तशाच आहेत. मात्र विविध पदार्थांच्या दुकानाचे प्रमाण वाढले आहे. पंचमी पर्यंत होळीच्या खुटावर देवीची पालखी येथील मांडावर असते. पंचमीला देवीची पालखी वाजत गाजत, नाचवित तिच्या मंदिरात नेली जाते. पूर्वी गावातील लोक या पालखीच्या बरोबरीने लाठ्या-काठ्यांचे खेळ करीत. देवीचा शिमगोत्सव हा परंपरेतला एक भाग आहे. पण या पेक्षा देवीच्या वैशिष्ट्यापूर्णआणि उल्लेखनीय  परंपरा आहेत. त्याविषयीही खूप काही लिहिण्यासाऱखे आमि सांगण्यासाऱखे आणि अनुभवण्यासारखे आहे.गावात खडकवली वाडीत स्वयंभू स्थानेश्वराची होळी आदल्या दिवशी साजरी होते. एकाच गावात दोन होळ्या आणि दोन खेळे एक टिप-यांवर नाचणारे आणि दुसरे डफावर नाचणारे, दोघेही मात्र गावात परंपरा जपताहेत. शिमग्यातील खेळे पाहणे आणि त्यांची रात्रीच्या वेळेची सोंगे पाहणे ही कोकणवासियांसाठी मोठी पर्वणी असते. या पर्वणीचा आनंद बालपणी लुटता आला.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: