शनिवार, २७ ऑगस्ट, २०११

अण्णांच्या उपोषणाच्या निमित्ताने...


जनलोकपाल विधेयक सरकारने पास करावे अशा अनेक मागण्यासाठी आग्रही असलेल्या थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा 13 वा दिवस आहे. अजून दोन तासांनी अण्णा आपले उपोषण मागे घेतील. काल संसदेत या विषयावर ऐतिहासिक अशी चर्चा झाली. आणि अण्णांच्या तीन मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे पंतप्रधानांचे  पत्र घेऊन मा. विलासराव देशमुख रामलिला मैदानावर आले. यानंतर देशात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. अण्णांनी या लढाईचे वर्णन -अर्धा विजय- अशा शब्दात केली आहे. अण्णांनी केलेले हे वर्णन पुढच्या संघर्षाचे सूचक आहे. 
संयमी आंदोलन
दर वेळी लोकांच्या मागण्यासाठी महात्मा गांधींच्या पाईकाने सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलनाला सुरवात करायची आणि मग सरकारने उशीराने तोडगे काढायचे हा राज्यकर्त्यांचा खाक्या झाला आहे. त्यांच्या जीवाशी खेळत बसायचे, जनांचा रेटा वाढला की मग चर्चेला यायचे हे नेहमीचे झाले आहे. अण्णांच्या आंदोलनाने सारा देश ढवळून निघाला आहे. अण्णांनी आणि लोकांनी ज्या संयमाने हे जनलोकपालासाठी आंदोलन केले त्याची स्तुती करावी तेवढी थोडी आहे. लोकांच्या महासागराला एका व्यक्तिने अहिंसेच्या मार्गाने-अण्णागिरीने बांधून ठेवणे, आणि त्याचबरोबर लोकांना विविध कार्यक्रम देत आंदोलनाची धार टिकवत ठेवणे हे सोपे नाही. जनशक्तीचा सहभाग हा पिचलेल्या मनांचा सहभाग होता. देशात हे कधी तरी घडणार होते. पण एवढ्या लवकर असा असंतोष बाहेर येईल असे राजकारण्यांना स्वप्नातही वाटले नसेल. देशातील जनता गेली 60 वर्षे निद्रीस्त नव्हती. फक्त ती संधी पाहत होती. हेही या आंदोलनाने अधेरेखित झाले आहे.
धोक्याची सूचना 
स्वातंत्र्यानंतर आपण सुराज्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी होती. रामराज्य यायला हवे होते. देशाने भौतिक प्रगती खूप केली. गरीबी हटविण्याऐवजी गरीब हटत आहेत. त्यांना कोणी वाली उरलेला नाही. सगळीकडे नफेखोरी, लाचलुचपत, भ्रष्टाचार सुरु असल्याने सामान्य माणसांचे जगणे कठीण झालेले आहे. या सा-यात देशातील युवक जास्त भरडला जात आहे. देणगी दिल्याशिवाय  तो शिक्षण घेवू शकत नाही. अन्न-वस्त्र-निवारा सा-यांच्या मूलभत गरजा त्याही भागत नाहीत. राजे तुपाशी, प्रजा उपाशी अशी स्थिती आहे. वंचित अधिकाधिक वंचित होत आहेत. गावागावात-वाड्यावाड्या आजही तहानलेल्या आणि अंधारात आहेत. ही लोकशाही आहे का असा कधी-कधी प्रश्न पडतो. 25 टक्के मतदाने निवडून गेलेले प्रतिनिधी जनतेचे खरे-खरे प्रतिनिधी आहेत का असा प्रश्न पडतो. त्यांना परत बोलावता येत नाही आणि त्यांना आम जनता जाब विचारु शकत नाही. अण्णागिरीने लोकांचे सारे बंध मोकळे झाले आहेत. प्रजा निद्रीस्त नाही. ती जागी झाली आहे. त्यामुळे लोकांच्या हिताच्या योजना आणि कायदे हे येत्या भविष्यकाळात आणाले लागतील. न्यायसंस्थेने काही करावे सांगितले की ते राज्यसत्ता वा नोकरशाहीने करायचे हे कुठवर चालणार? येत्या काळात राजकीय पक्षांना त्यांच्या विचार सरणीत, कृतीत बदल करायला भाग पाडणारे असे आंदोलन झाले आहे. राजकीय पक्ष ज्या मुद्यांवर निवडून येतात त्यांची पूर्तता ते करतात की नाही हे कोणीच पाहात नाही. सत्तेचा दुरुपयोग हा नेहमीच होत आला आहे. लोकांच्या मागण्या घेवून शांततेच्या मार्गाने भांडणे म्हणजे असंसदीय ही जी मानसिकता आहे. तीही बदलायला हवी. लोकांच्या पैशातून निवडून यायचे, लोकांच्याच तिजोरीतून अलिशान जीवन जगायचे, लोकांचीच सारी व्यवस्था वेठीला धरायची आणि उलट लोकांनाच सांगायचे की हा मार्ग तो मार्ग बरोबर नाही असे सांगायचे. आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. आपण लोकांसाठी त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहोत. याचाच विसर पडावा इतकी झापडं आमच्या लोकप्रतिनींनी लावली आहेत. मात्र लोक जागे झाले आहेत. ते अनेकांना ओसाड करुन सोडतील. त्यामुळे राजकीय पक्षांनी वेळीच सावध होण्याची गरज तर आहे. पण शांततेच्या मार्गाने होणा-या आंदोलनांना कायदेशीर आडकाठ्याही असू नयेत यासाठीही काही प्रावधान होण्याची गरज अधोरेखित करावीशी वाटते.
प्रसिद्धी माध्यमांची कमाल
अण्णांच्या आंदोलनाला जी मोठी धार दिली ती प्रसिद्धी माध्यामांनी... लोकशाहीच्या चवथ्या स्तंभाने अहोरात्र या आंदोलनाचे पैलू लोकांसमोर आणले. एकूण या आंदोलनात माहिती आणि तंत्रज्ञानेही मोठे बळ दिले. सा-या जलून आलेल्या गोष्टींनी हे आंदोलन जरी यशस्वी झालं असलं तरी लढाई अजून संपलेली नाही. लोकांनी अत्यावश्यक कायद्यांसाठी रेटा वाढविणे गरजेचे आहे. तूर्तास भारी भक्कम लोकपालाची वाट पाहात बसणे उचित होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: