शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

चिरतरूण `परमेश्वर'!

 शिक्षकांच्या पतपेढीचा सदस्य झाल्यानंतर मी प्रथम कर्जासाठी विक्रोळीच्या शाखेत गेलो. ते साल मला वाटतं ही घटना १९९१ मधील. त्यावेळी शिंदे नावाचेच शाखा व्यवस्थापक होते. मी पतपेढीचा सदस्य होऊन सहा महिने पूर्ण होण्याकरीता काही दिवस कमी पडत होते. त्यामुळे कर्ज देण्याच्या नियमावर त्यांनी बोट ठेवलं. माझी तर काही ओळख नव्हती.मी मार्ग विचारला. तर त्यांनी संचालकांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांनी शिदेंसाहेबांना भेटा, ते बाजूलाच बसलेले आहेत असे सांगितले. आणि तेथे साध्या खुर्चीवर बसलेल्या बसलेल्या परमेश्वरांची पहिली भेट झाली.
मी त्यांना माझी अडचण सांगितली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माझंया पतपेढीतील पहिलं कर्ज मंजूर केलं. ते हे सगळं करताना ते म्हणाले, आम्ही माणसं ओळखतो.तुमचा चेहरा सांगतो. तुम्ही नुसते शिक्षक नाहीत. विशेष काही तरी करणारे आहात. मी मग माझी पत्रकारीतेबद्दल माहिती सांगितली. बघा, आता कसं. आम्हांला माणसांची पारख आहे.
मला वाटतं त्या क्षणापासून सुरू झालेली आमची मैत्री आजही चालू आहे. ते वयाने मोठे असले. तरी त्यांच्याशी असलेल्या मैत्रीत स्पष्टता आणि जिव्हाळा आहे. तो आम्ही दोघांनीही जपला आहे.
काही वर्षापूर्वी संस्थेच्या कारभाराबाबत शिक्षक सहका-यांनी उठाव केला. या उठावात पत्रकार म्हणून मी तटस्थ होतो. मी माझी भूमिका त्यावेळी खाजगीत पण सरांना स्पष्टपणे सांगितली होती. पण काही संचालकांच्यामुळे त्यांच्या मतांनासुद्धा मर्यादा पडल्या. असो तो एक जमाना झाला. पण यातून संस्था खूप शिकली असं मला वाटते. नाहीतर त्यावेळी विरोधात असलेली मंडळी एक-एक करीत अधिकार पदावर आहेत.
सरांच्या मुलींचं लग्न वाशी येथे होते. त्यावेळी मला लग्नाला वेळेत पोहोचता आले नाही. स्वागत समारंभ आटोपून वर-वधू बाहेर पडण्याच्या बेतात असतानाच मी आणि माझी पत्नी तेथे पोहोचलो. आणि सरांनाही भरून आलं. 2007 सालच्या निवडणुकीत माझी निवडणुकीची ड्युटी कुल्यामध्ये त्यांच्या शिक्षक नगरच्या घराजवळ लागली होती. आदल्या दिवशी मी सरांना फोन करून ही माहिती दिली. सरांनी यावेळी मी म्हटलं आपण भेटूया. निवडणुकीच्या दिवशी भल्या पहाटे मी मतदान केंद्रात गेलो. रितसर वेळेवर मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. खूप गर्दी त्या केंद्रावर होती. कसली उसंतच आम्हा सहका-यांना मिळत नव्हती. जेवणाच्या डब्यालाही हात लावता येत नव्हता. आणि अशा वेळी मला शोधत परमेश्वर आले. हातात पिशवी होती. आणि त्यात डब्बा होता. मी क्षणभर स्तब्ध झालो. सरांनी मायेने आणलेला तो डब्बा आणि त्यातील पदार्थ मी आणि माझ्या सहका-यांनी काम करता-करता खाल्ले. त्यातील पदार्थांची चव आणि तो जिव्हाळा आजही मनात साठून आहे.
आपल्या माणसाला वेळोवेळी मान देणे, त्यांना कार्यक्रमांना बोलावणे यातूनही त्यांनी जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या महादेव केणी विद्यालयाच्या अनेक कार्यक्रमांना मला त्यांनी बोलावले. मीही उत्साहाने त्यांच्या कार्यक्रमांना जात आलो आहे.
पतपेढीचे संचालकपदाच्या पलिकडे जावून त्यांनी नातं जपलं आहे. कोणत्याही शिक्षकाची काही अडचण असूद्या सरांना फोन केला, की विनायकराव काम झालं. असं त्याचं नेहमीचं वाक्य असते. आणि खरोखर काम झालेलं असतं. सर बी.पी.एम. शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. त्याच्या शुभेच्छा समारंभाला उपस्थित राहण्याची माझी इच्छा होती, पण ते जमलं नाही. त्यांच्यावर संस्था गौरव अंक काढते आहे असे समजल्यावर मलाही आनंद झाला. आठवणीचं सगळेच पदर उलगडता येणार नाहीत. काही आठवणी या मनाच्या कुपीत ठेवायच्या असतात. काही आठवणी अशाच आहेत. सरांच्या बाबतीत मला एक जाणवतं ते नावाप्रमाणे इतरांशी म्हणजे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या सा-यांना ते सहकार्य करीत आले. काही झालं तरी त्यांनी कटुता उराशी बाळगून जगत नाहीत. परोपकारी वृत्तीने जगत आले, म्हणून हा माणूस साठीकडे झुकतानाही चिरतरूण भासतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: