बुधवार, २० एप्रिल, २०११

कोकणचे काय होणार


कोकणचे काय होणार....
राजापूर तालुका हा जगात दर तीन वर्षांनी येणा-या गंगेसाठी प्रसिद्ध. पण येथे येणा-या अणु-ऊर्जा प्रकल्पाने ते अधिक नकाशावर आले आहे. प्रकल्प व्हावा न व्हावा यावरून नेहमीच सर्व पक्षीय अशा दोन बाजूचे लोक असतात. कोकणाला हे काही नवे नाही आणि देशासाठी ही नवी गोष्ट नाही. देशात ऊर्जेची समस्य़ा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. म्हणून असे प्रकल्प आणताना जबरदस्तीने आणावे का हा जसा एक प्रश्न आहे तसेच या प्रकल्पात संघर्ष आणि सामान्याचे बळी घेणे कितपत योग्य आहे. जैतापूर नाटेमध्ये निष्पाप तरूणाचा हकनाक गेलेला बळीच्या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. कोकणात हिंदू-मुसलमानांचे एक अनोखे नाते आजपर्यंत या भूमीने अनुभवले आहे. दंगल वा संघर्ष असा घडलेला नाही. नाटे-जैतापूरमध्ये काल जे घडले ते निषेधार्ह आहे. कोकणात होऊ घातलेला हा अणुऊर्जा प्रकल्प पहिल्यापासून वादात आहे. या वादात मार्ग निघालेला नाही. शिवसेनेने प्रकल्पग्रस्तांची बाजू घेवून हा वाद अधिक गडद झाला आहे. शांत कोकण धगधगत आहे.  कोकण विकासाच्या गमज्यात कोकणाचा -हास तर मांडला जात नाही ना. ... अशी कधी-कधी शंका येते. एका देशासाठीच्या अणु प्रकल्पाने कोकणच्या सा-या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतेय. दहा हजार मेगावॅटच्या प्रकल्पाची क्षमता कमी करून तो दोन वा तीन हजार मेगावॅट क्षमतेवर आणून लोकांच्या मनातील भय आता कमी करता येणार नाही का....
कोकणची राख -रांगोळी आणि स्मशान बनविण्याचे पद्धतशीर काम पूर्वीपासून राज्यकर्ते करीत आहेत. निसर्ग संपन्न कोकणात साजेसे प्रकल्प सत्ताधारी वा आता विरोध करणा-या लोकांनी कधीच आणले नाहीत. कोकणा माणसाला भावनेच्या साम्राज्यात गुरफटवून त्याची सत्तानाशी करण्याच उद्योग काही विशिष्ट विचारसरणीने केला आहे. समुद्रात वाहून जाणा-या पाण्याला अडवणे दूर पण पिण्याच्या पाण्यातही भ्रष्टाचाराच्या रूपाने  हात धुवून घेणा-या अधिका-यांना जे जे सत्तेवर येतात ते साथ करीत असतात. रावसाहेब, भाऊ पिळत आहेत आणि पिळत आहेत. यांच्यामुळे कोकणच्या योजनांचे तीन तेरा वाजले आहेत. तसेच फलोत्पादन(आंबा-काजू) ने तर कोकणची सारी निसर्गसंपदाच नष्ठ करून टाकली आहे. देशात निसर्ग संपन्न असे कोकण भकास झाले आहे. त्याला आपले धोरणी राज्यकर्ते आणि नाकर्ते प्रशासन जबाबदार आहे. या कोकणचे काय होणार ते परमेश्वरालाच ठाऊक....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: