रविवार, १७ जून, २०१२

दिवस पावसाचे....

दिवस पावसाचे..(१)







प्राथमिक शिक्षण कोकणातील कोतापूर नावाच्या सुंदरशा खेड्यात झालं. पाचवीत दोन वर्षे शाळा सोडल्याने  निसर्गात हुदडण्यासाठी अधिक दोन वर्षे मिळाली. पण पहिला पाऊस पडला की, त्यात भिजण्यात मजा काही औरच असे. पहिल्या पावसाची सुरवात प्रथम रिम-झिम असे. पण एकदा कोसळू लागला की, रिम-झिम पावस पावसाने मातीचा येणारा गंध लोप पावायचा. येरे येरे पावसा...हे गाणं म्हणत आम्ही पोरं अंगावर पावसाचे टपोरे थेंब अंगावर झेलताना एक वेगळाच आनंद मिळे. घरातील मोठी माणसं अंगावर घामोळे घालवण्यासाठी मुद्दाहून पावसात भिजायला सांगायचे. पण पावसाच्या सरींचा जोर वाढला की, घरात येण्यासाठी ओरडा सुरू व्हायचा.

पावसाच्या दिवसात आवडीचे खेळ असत. पावसात कौलावरून पडणारे पागोळ्याचीं थंड धार ओंजळीत पकडून ते चेह-यावर मारणे. अंगण्यातील वाहत्या पाण्यात कधी हलके लाकूड टाकणे, ते वाहत जाताना त्याची मजा पाहत राहणे. कधी कागदाच्या होड्या करायच्या त्याही अशाच पाण्यात सोडून त्या वाहताना एकटक पाहत राहणे. हे ओघाने यायचे. तेव्हा रस्ते डांबरी नव्हते. मातीच्या रस्त्यावरून जेव्हा पहिल्या पावसाचे लालभडक पाणी वाहत येताना त्याच्या लोंढ्याबरोबर पातेरा, गवताचे तूस सारे काही वाहत येत असे. ते पाहताना खूप मजा यायची. घरभाटाच्या मळ्यात पाणा साचायचे या पाण्यात बुचकळणे, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे,  त्यात खेळताना पाय घसरून पडण्यातही मौज वाटायची.

पावसाचा काही दिवसांनी जोर वाढायचा आणि मग शेतीच्या कामाला सुरवात व्हायची. भात लावणीसाठी चिखलणी व्हायची. पण त्या अगोदर बियाणे पेरणी व्हायची ती रोप वाढवण्यासाठी त्याला दाढ पेरणी म्हणतात. दाढ वाढली की, चिखलणीने ती ठराविक अंतराने लावली जायची. लहानपणी आमचे शेत वाघ्या धनगर अधेलीने करी, माझी आई-मोठ्याई ते पण त्यांच्यासोबत काम करीत. माझ्याकडे त्यावेळी ओढ्याचे वा पावसाचे पाणी शेतापर्यंत आणण्याची कामगिरी असे. हातात फावडे घेवून माझी स्वारी हारळ्यातून पाणी शेतापर्यंत आणण्यात खूप धन्यता मानी. वाघ्या नाना त्याचे आजही भेटतो तेव्हा कौतुक करतो.  जोताबरोबर बैलांच्या मागे चिखल तुडवत फिरणे हाही एक वेगळा  आनंद असे. 

शेती सुरू असताना फणसाच्या उकडवलेल्या अथवा भाजलेल्या बिया ज्यांना अटला म्हणतात त्यांची चव पावसाळ्याच्या काळात काही आगळी-वेगळी वाटायची. उकडा आंबाही त्या काळात गोड वाटे. खूप पावूस पडला की, हवूर(पूर) पाहायला खूप आवडायचे. वहाळाचे वाढलेले पाणी लक्ष्यात घेवून राखणे(गुराखी) आपली राखणीची गुरे घेवून घरी परतत तेव्हा वहाळाचा हवूर पाहण्यासाठी छत्री, खोल, घोंगडी घेवून वहाळाच्या अलिकडे थांबून ते दृश्य अनुभवणे हाही एक आनंद असे. तसेच शाळेतून पावसाळ्यात साकवावरून जाताना प-याचे उताराकडे वाहणारे पाणी पाहतच राहवे असे वाटे. पाण्याचे कोसळणे, त्याचा होणारा आवाज आजही कानात घुमतो तसे ते दृश्यही डोळ्यासमोर उभे राहते. अतिवृष्टी झाली की, मास्तर शाळा सोडून देत तेव्हा आम्हाला न्यायला कुठचाही पालक येत नसे. फक्त मास्तरांची घरी थेट जाण्याची ताकीद असायची. मातीच्या रंगाचा पूर पाण्यात आमची स्वारी धन्यता मानायची. (अपूर्ण)








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: