शुक्रवार, ६ जुलै, २०१२


आता स्वच्छ राजकीय पटलावर शिक्षक चळवळ!

    राज्य विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभागाच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी राष्ट्रवादी-कॉग्रेसच्या आघाडीने पुरती मोडून काढली. पण मुंबई शिक्षक मतदार संघातही भारतीय जनता पक्षाची एक शाखा असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या उमेदवारांची अनामत रक्कमही वाचू शकली नाही. या निवडणुकीत लोकभारती आणि शिक्षक भारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांनी सा-यांच्याच अनामत रकमा जप्त केल्या आहेत. गेली अनेक वर्षे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ सत्तारूढ कॉग्रेस पक्षाला जिंकता आलेले नाहीत. यावेळी कपिल पाटील विरूद्ध सारे असे चित्र होते. त्यात त्यांच्या नशिबापेक्षा त्यांचे व कार्यकर्त्यांचे कष्ठ, केलेले काम, त्यांची पोचपावती शिक्षकांनी कपील पाटील यांच्या पारड्यात विजयाच्या रूपाने टाकली. असे म्हटले तर ती अतिशोयक्ती ठरणार नाही. एकूण राजकीय सारीपाटावर सगळे फासे वेगवेगळ्या दिशेने पडायला सुरवात झाली. मुंबई विभागात शिक्षक मतदार संघात तब्बल  १५ उमेदवार आणि प्रत्येक उमेदवाराला प्रमुख राजकीय पक्षांनी दिलेला पाठींबा यामुळे ही निवडणुक रंगतदार ठरली, पण त्याही पेक्षा या निवडणुकीने आता शिक्षकांच्या या चळवळीत राजकारणाचा खराखुरा प्रवेश झाला आहे.
    कपील पाटील यांना मिळालेली मते (९७४९) ही जशी लक्षणीय आहेत. तशी गेल्या सहा वर्षात त्यांनी जे काम केले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी पद्धतशीरपणे शिक्षक मतदार नोंदणी, शिक्षकांसाठी बहुविध कार्यक्रम, त्यांचे प्राथमिक प्रश्न, १ तारखेला वेतन आणि या सारख्या ज्या काही गोष्टी केल्या त्या पाटील यांच्यासाठी जमेच्या आणि विजयाचा मार्ग सोपा करणा-या घटना ठरल्या. पाटील यांनी स्थानिक विकास कार्यक्रमातून केलेल्या कामांचा विरोधकांनी एवढा धसका घेतला की, त्याबद्दल अधिकाधिक अपप्रचार त्यांच्या विरोधी उमेदवारींनी केला. पण या सा-याचा उलटपक्षी पाटील यांना फायदाच झाला.
    या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयाऱीशिवाय उडी घेतली. त्यामुळे संजय चित्रे या एका विद्यार्थी चळवळीतील नेता, मनसे सरचिटणीस आणि मनसे शिक्षक-शिक्षकेतर सेनेच्या अध्यक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले. विक्रोळीच्या संदेश विद्यालयाचे अवध्वर्यू बाळासाहेब म्हात्रे यांनी कॉंग्रेसच्या पाठींब्याशिवाय निवडणुकीत दुस-यांदा नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. ते दुस-या क्रमांकावर फेकले गेले.(१५२९ मते) भाजपाच्या डॉ. मनीषा कायंदे या पहिल्यापासून शिक्षक मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होत्याच. त्यांनी अवनीच्या माध्यमातून शिक्षकांच्या समोर येवून महिला शिक्षिकांची बाजू मांडीत. पाटील यांच्या कार्याच्या त्या म्हात्रे यांच्याप्रमाणे मोठ्या विरोधक होत्या. गेल्या निवडणुकीच्या वेळी शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद यादव यांना मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली. आणि अनपेक्षित त्यांना डावलून सुरेश उपाध्ये यांना उमेदवारी देण्यात आली होती. यादव यांनी मात्र कोणताही बंडाचा त्यावेळी पावित्रा घेतला नाही. म्हणूनच यावेळी या सामान्य कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यात आली. पण त्यांना कायंदेच्या बंडखोरीने ग्रासून टाकले. विशेष म्हणजे त्यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला. दादरच्या सेनापती बापट मार्गाखाली अवनी ट्रस्टचे झुणकाभाकर केंद्र आहे. या ट्रस्टवर ठाकरे विश्वस्त आहेत. पक्षातून काढण्याची धमकी दिल्यानंतर त्या बधल्या नाहीत. कारवाईनंतर तर त्यांना शिवसेनेने जाहीर पाठींबाच देऊन टाकला. एका परिने शिवसेनेने भाजपवर राजकीय दबाब ठेवण्याची संधी वाया जाऊ दिली नाही.
    निवडणूक आटोपली आहे. पण या निवडणुकीचे कवित्व गायले जाणार. शिक्षक मतदार संघातील निवडणूक कधी यायची आणि कधी जायची हे कळत नसे. या वेळी प्रचाराची राळ उडवली गेली. सगळे पक्ष या कामात गुंतल्याचे चित्र होते. शह-काटशह याप्रमाणे शिक्षकांसाठी पार्ट्यांचे आयोजन केले गेले. विधीमंडळात सामान्य शिक्षकांचा प्रतिनिधी निवडून देण्यासाठी गुळगुळीत कागदावरील अहवालांपासून ते माहितीपत्रकांपासून, हायटेक प्रचारही केला गेला. निवडणुकीच्या दिवशी तर इतर सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे वातावरण होते. यापूर्वी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक चळवळीतील संघटनाचे झेंडे दिसत. त्यांची जागा राजकीय पक्षांच्या झेंड्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण फक्त शिक्षकातील प्रतिनिधींना असते. असे पूर्वी म्हटले जाई. आता ही जागा चळवळीबाहेरचा कुणीही घेवू शकतो. यावर या निवडणुकीने शिक्कामोर्तेब तर केले आहे. पण भविष्यात हा सन्मान शिक्षकाच्या वाट्याला येईल की नाही. याची शंका आहे. शिक्षकांच्या सन्मानांची लढाई लढता-लढता शिक्षकांचा अनादर होणार नाही याची काळजी काळाला घ्यावी लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: